अमरावतीत अवैध मटका-जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; सात ठिकाणी छापे, आठ आरोपी ताब्यात

अमरावती शहरात अवैध वरली मटका आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून दिली आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार शहर गुन्हेशाखेने विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत तब्बल सात मटका अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून जुगार साहित्य आणि रोख रक्कम असा दहा हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमरावती शहरात अवैध वरली मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात शहर गुन्हेशाखेने समन्वित मोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकांनी बडनेरा, नागपुरी गेट आणि गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धाड टाकत कारवाई केली.
बडनेरा परिसरातील वरूडा पुलाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर छापा टाकत पोलिसांनी गौतम चिंचखेडे आणि राजेश भालेकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपुरी गेट परिसरातील कमेला ग्राउंड आणि पठाण चौक येथे सुरू असलेल्या वरली मटका व्यवसायावरही पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी शेख नईम शेख फईक आणि मोहम्मद सलीम मोहम्मद हनीफ यांच्याकडून जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
याशिवाय गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव परिसरात सुरू असलेल्या मटका धंद्यावरही छापा टाकण्यात आला. येथे निखिल नंदकुमार थोरात याच्याकडून मटका साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वरली मटका साहित्य आणि रोख रक्कम मिळून एकूण १० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
शहरातील अवैध धंदे, मटका आणि जुगार अड्ड्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात कायद्याचा धाक अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.



