कामरगावमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; विद्यार्थ्यांसमोर विज्ञानाचा जिवंत धडा

“चक्क सावली जेव्हा गायब होते तेव्हा काय घडतं?” हा आश्चर्यचकित करणारा अनुभव कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ‘शून्य सावली दिवस’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचा एक जिवंत आणि रंजक धडा मिळाला.
कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथे २० मे रोजी ‘शून्य सावली दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमप्रमुख गोपाल खाडे, नीता तोडकर आणि दिपाली खोडके यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष वैज्ञानिक प्रयोगांचे आयोजन केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी काचेवर आणि जमिनीवर विविध वस्तू ठेवून त्यांच्या सावल्यांचे निरीक्षण केले. दुपारच्या विशिष्ट वेळी जमिनीवर ठेवलेल्या वस्तूंची सावली काही क्षणांसाठी जवळपास अदृश्य झाल्याचे दिसून आले. तर काचेवर ठेवलेल्या वस्तूंची सावली काचेच्या खाली स्पष्टपणे दिसत होती.
या प्रयोगातून विद्यार्थ्यांना महत्त्वाचा वैज्ञानिक संदेश मिळाला की, सावली पूर्णपणे नाहीशी होत नाही. सूर्यप्रकाशाचा कोन बदलल्यामुळे ती दिसेनाशी होते. यामुळे ‘शून्य सावली दिवस’ ही नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना असल्याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजले.
यावेळी शिक्षकांनी पृथ्वीची सूर्याभोवतीची गती, उत्तरायण-दक्षिणायण, सूर्याची बदलती स्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भौगोलिक घटनांची माहिती सोप्या भाषेत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची जिज्ञासा वाढली, निरीक्षण क्षमता विकसित झाली आणि अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संदेशही देण्यात आला.
उन्हाळ्याच्या तीव्र प्रकाशात अनुभवलेला हा ‘शून्य सावली दिवस’ विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते अनुभवातून अधिक प्रभावीपणे समजते, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



