एआय आणि डिजिटल नवोपक्रमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती; ‘टेक महाइम्पॅक्ट 2026’मध्ये तज्ज्ञांचे मत

मुंबईत आयोजित ‘टेक महाइम्पॅक्ट 2026’ परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यावर भर देण्यात आला. प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार राज्य शासनाने यावेळी व्यक्त केला.
‘पॉवरिंग महाराष्ट्राज इकॉनॉमी थ्रू एआय, ई-गव्हर्नन्स अँड डिजिटल इनोव्हेशन’ या विषयावरील परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी डिजिटल परिवर्तनाच्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा केली. परिषदेत तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या विषयांवर उच्चस्तरीय विचारमंथन झाले.
या चर्चासत्रात डॉ. ज्ञानेश्वर मुळे, भुवनेश्वरी एस., अजय प्रसाद श्रीवास्तव, अभिषेक लाहिरी, के. व्यंकटेशम, अवर्तन बोकील आणि भगवान पाटील यांनी सहभाग घेतला.
राज्य शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, शासन केवळ कागदपत्रांचे डिजिटायझेशन करत नसून संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेचे डिजिटलायझेशन आणि ‘गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग’वर काम करत आहे. विविध विभागांचे डेटाबेस एपीआय इंटिग्रेशनद्वारे परस्पर जोडले जात असून त्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने आणि सुलभपणे उपलब्ध होतील.
तसेच एआय अॅनालिटिक्सच्या मदतीने समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यांचा अंदाज घेऊन डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया मजबूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी समस्येचे अचूक विश्लेषण आवश्यक असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा उद्देश नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे हा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सीएसआर 2.0 च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
बृहस्पती टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संचालक के. व्यंकटेशम यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एआयमुळे मोठे बदल घडून येतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार शैक्षणिक सामग्री तयार करण्यासाठी एआय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
एसटीपीआय पुणेचे संचालक अजय प्रसाद श्रीवास्तव यांनी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापरावर प्रकाश टाकला. एआयच्या मदतीने विकसित करण्यात आलेले अॅप ऊस काढणीची योग्य वेळ निश्चित करते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयर्न माउंटन इंडियाचे अभिषेक लाहिरी यांनी शासकीय योजनांमध्ये एआयचा वापर करताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. ‘एक्सप्लेनेबल एआय’ची संकल्पना प्रशासनात विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अवर्तन बोकील यांनी डिजिटल परिवर्तनाची सुरुवात ग्रामीण भागापासून करण्याची गरज व्यक्त केली. सीएसआर आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी समन्वय साधून व्यापक सामाजिक बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले.
या परिसंवादातून महाराष्ट्र शासन आणि महाआयटी प्रशासनात एआयचा प्रभावी वापर करून पारदर्शकता वाढविणे, सेवा वितरण अधिक कार्यक्षम करणे आणि नागरिकांचे ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले.



