सोनं खरेदी थांबली तर तीन कोटी कारागिरांच्या रोजगारावर गदा” – ज्वेलर्स असोसिएशनची चिंता

मुंबई | प्रतिनिधी
देशात सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायाशी थेट आणि अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या सुमारे तीन कोटी कारागिरांच्या रोजगारावर संकट येऊ शकतं, अशी चिंता ज्वेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबली तर केवळ सोनार व्यवसायालाच नव्हे, तर लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा फटका बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
कुमार जैन म्हणाले, देशात दरवर्षी सुमारे 800 टन सोन्याची आयात केली जाते आणि सोन्याच्या व्यापाराची उलाढाल हजारो कोटी रुपयांची आहे. या क्षेत्रात दागिने तयार करणारे कारागीर, डिझायनर, पॉलिश कामगार, विक्रेते आणि इतर सहाय्यक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे.
“जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचा निर्णय घेतला, तर उद्योगावर गंभीर परिणाम होईल. व्यापाऱ्यांना कामगारांचे पगार देणं कठीण होईल. परिणामी खर्च कपात करावी लागेल आणि अनेकांचे रोजगार धोक्यात येतील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या मते, महागाईच्या काळात सामान्य नागरिक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोनं हे केवळ दागिन्यापुरतं मर्यादित नसून आर्थिक सुरक्षिततेचं साधनही मानलं जातं.
कुमार जैन यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन देशहिताच्या दृष्टीने योग्य असू शकतं. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, डॉलरच्या किमतीतील वाढ आणि चीननंतर भारतात सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असल्याने आयातीवरील खर्च वाढतो. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर होऊ शकतो.
“देशभक्ती दाखवणं गरजेचं आहे, मात्र त्याचवेळी लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालणारा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता कामा नये,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सोन्याच्या खरेदीवर नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा सुरू असताना, या निर्णयाचा रोजगार, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन संतुलित धोरण आखण्याची गरज असल्याचं मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त केलं जात आहे.



