citynewsDhuleLatest NewsMaharashtra

शेतकऱ्यांना ‘लिंकिंग’ची सक्ती केल्यास कठोर कारवाई; पालकमंत्री जयकुमार रावल यांचा इशारा

धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते किंवा इतर कृषी निविष्ठांची विक्री करताना अनावश्यक ‘लिंकिंग’ची सक्ती केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

पालकमंत्री रावल यांनी कृषी विभागाला जिल्ह्यातील शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, गुणवत्तापूर्ण बियाणे आणि पीक पद्धतीत बदल यावर भर देत शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

कडधान्य, तेलबिया आणि विविध पिकांच्या क्षेत्रवाढीवर भर

जिल्ह्यात कडधान्य, तृणधान्य, गळितधान्य, तूर, भुईमूग, सूर्यफूल, मसाला पिके, भाजीपाला, फुलशेती आणि फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. कपाशी क्षेत्रवाढीसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यासही सांगण्यात आले.

बनावट बियाणे आणि खतांच्या काळाबाजारावर कारवाई

रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेक कमी करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

15 जूनपर्यंत 100 टक्के ॲग्रीस्टॅक नोंदणीचे लक्ष्य

शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी 15 जूनपर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीची माहिती वेळेत देण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

तक्रार निवारण कक्ष आणि कृषी कर्जावर भर

महावितरणने तालुकानिहाय तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत, तर बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कृषी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश व्हावा यासाठी ग्रामसभांद्वारे जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.

खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी 36 हजार 490 क्विंटल विविध पिकांची बियाणे, 9.20 लाख कापूस बियाण्यांची पाकिटे आणि 1 लाख 59 हजार 609 टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध होणार आहे.

बैठकीत संतुलित खत वापर जागरुकता अभियान 2026 च्या भित्तीपत्रकाचे अनावरण तसेच कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश देत पालकमंत्री रावल यांनी शेतकरीहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button