Accident NewscitynewsIndia NewsLatest News

ओडिशात भीषण अपघात; ट्रकला SUVची जोरदार धडक, दोन महिलांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

जाजपूर (ओडिशा) : ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन महिलांसह किमान पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश पसरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजपूर जिल्ह्यातील जेनापूर पोलीस ठाणे हद्दीतील दैतारी–पारादीप एक्सप्रेस महामार्गावर, बराडा चौकाजवळ हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी एक एसयूव्ही कार मागून ट्रकवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, एसयूव्ही थेट ट्रकखाली घुसली.

या भीषण धडकेत एसयूव्हीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये एकूण १२ जण प्रवास करत होते, ज्यामध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. हे सर्वजण क्योंझर जिल्ह्यातील लग्नसमारंभ आटोपून घरी परतत होते, त्यावेळी हा भीषण अपघात घडला.

अपघातातील जखमींना तातडीने धर्मशाळा आणि बडाचना सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख कंद्रा पुर्ती, त्यांची पत्नी गीता पुर्ती, बालमा मुंडा, त्यांची मुलगी मालती मुंडा आणि नमिता नायक अशी झाली आहे. हे सर्वजण पुरुषोत्तमपूर-संजयनगर गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. जेनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

या भीषण अपघाताने ओडिशात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वेग आणि महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button