भवानीपूरमध्ये ममतांना धक्का; शुभेंदू अधिकारींचा दणदणीत विजय, बंगालच्या राजकारणात मोठा उलटफेर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवत भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला आहे. तब्बल १५,१०५ मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, बंगालच्या राजकारणातील एक निर्णायक आणि प्रतीकात्मक वळण मानला जात आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच शुभेंदू अधिकारी यांनी विजयाचे प्रमाणपत्र हातात घेत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ममता बॅनर्जी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा केवळ विजय नाही, तर बंगालच्या राजकारणातील बदलाचा स्पष्ट संदेश आहे.”
भवानीपूरसारख्या ममता बॅनर्जी यांच्या मजबूत गडात मिळालेला हा विजय भाजपसाठी मोठा राजकीय टर्निंग पॉईंट मानला जात आहे. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये ममतांना पराभूत केल्यानंतर आता भवानीपूरमध्येही शुभेंदू यांनी त्यांच्यावर मात करत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
भवानीपूरमध्ये मोठा उलटफेर
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, शुभेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली. त्यामुळे शुभेंदू यांनी १५,१०५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय नोंदवला.
विशेष म्हणजे, मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी जोरदार मुसंडी मारत सामना आपल्या बाजूने खेचला.
“हा हिंदुत्वाचा विजय” – शुभेंदू अधिकारी
विजयानंतर शुभेंदू अधिकारी यांनी हा निकाल “हिंदुत्वाचा विजय” असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीत विविध समाजघटकांनी भाजपला पाठिंबा दिला.
त्यांच्या मते, पारंपरिकरित्या इतर पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांनीही यावेळी तृणमूलविरोधी मत एकवटत भाजपच्या बाजूने मतदान केलं. काही डाव्या विचारसरणीच्या मतदारांनीही भाजपला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला.
“ममतांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट?”
शुभेंदू अधिकारी यांनी या निकालाला ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अस्ताची सुरुवात असल्याचंही म्हटलं.
“हा निकाल ममता बॅनर्जी यांच्या राजकीय युगाच्या समाप्तीचा संकेत आहे,” असं विधान करत त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
अमित शहा सतत संपर्कात
शुभेंदू अधिकारी यांनी सांगितलं की, या हाय-प्रोफाइल लढतीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सतत त्यांच्या संपर्कात होते. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि या लढतीबाबत विशेष लक्ष ठेवलं.
बंगालच्या राजकारणात नवं समीकरण
भवानीपूरमधील हा निकाल केवळ एका मतदारसंघाचा निकाल नसून, पश्चिम बंगालच्या राजकारणातील बदलत्या राजकीय समीकरणांचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.
ममता बॅनर्जींच्या गडात झालेला हा पराभव तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला असून, भाजपसाठी बंगालमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात मानली जात आहे.
नंदीग्रामनंतर भवानीपूर… शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना धक्का देत बंगालच्या राजकारणात स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आहे.



