“‘अतुल्य मेलघाट’च्या रेत घाटांवर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राइक; रात्रीच्या छाप्यात अवैध उत्खननाचा भंडाफोड”

अमरावती जिल्ह्यातील मेलघाट परिसरातील सोनाबर्डी आणि रत्नापूर रेत घाटांवर प्रशासनाने मोठी कारवाई करत अवैध उत्खननाचा पर्दाफाश केला आहे. ‘अतुल्य मेलघाट ग्रुप’शी संबंधित या रेत घाटांवर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) रात्री गुप्त छापा टाकत थेट ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाबर्डी आणि रत्नापूर येथील रेत घाटांवर नियम धाब्यावर बसवत रात्रीच्या अंधारात मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू होते. या संदर्भात प्रशासनाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर SDO यांनी पथकासह अचानक छापा टाकला. या कारवाईत मशीनद्वारे सुरू असलेले उत्खनन रंगेहात पकडण्यात आले.
छाप्यादरम्यान प्रशासनाने घटनास्थळावरील यंत्रसामग्री, वाहने आणि उत्खननाशी संबंधित पुरावे ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे मेलघाट परिसरात खळबळ उडाली असून अवैध वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, रेत घाट चालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, नियमबाह्य उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
मेलघाटातील रेत घाटांवर सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधातील ही कारवाई प्रशासनाचा मोठा इशारा मानला जात असून, पुढे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



