citynewsIndia NewsLatest News

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या अफवांना फेटाळले; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. काही माध्यमांमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २५ ते २८ रुपयांची वाढ होऊ शकते, असा दावा करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने या सर्व दाव्यांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. अशा प्रकारच्या बातम्या भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या असून लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा त्यामागील हेतू असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असली तरी त्याचा अतिरिक्त भार सामान्य नागरिकांवर पडू नये यासाठी सरकार आणि तेल कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या स्पष्टीकरणामुळे दरवाढीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असला, तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भविष्यात इंधन दरांवर काय परिणाम होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button