दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा! रुग्णालयाच्या पाचव्या मजल्याच्या बाल्कनीवर चढलेल्या रुग्णाची उडी मारण्याची धमकी

नवी दिल्ली | प्रतिनिधी
दिल्लीतील आनंद विहार परिसरातील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रुग्णालयात दाखल असलेला एक रुग्ण अचानक पाचव्या मजल्यावरील बाल्कनीच्या बाहेरील कडेला जाऊन बसला आणि खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली. काही वेळातच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली. रुग्णाला समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रुग्णालय प्रशासन आणि दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये संबंधित रुग्ण बाल्कनीच्या अरुंद कडेला बसलेला दिसत आहे. तर खाली मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमलेली होती.
दरम्यान, जवळील खिडकीतून एक व्यक्ती त्या रुग्णाशी संवाद साधत त्याला शांत करण्याचा आणि खाली उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रुग्णाला सुरक्षितपणे खाली आणण्यात यश आले की नाही, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.



