AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

‘हेल्थ चेकअप’ मोहिमेचा मोठा परिणाम; आयुक्त वर्षा लड्डा अ‍ॅक्शन मोडमध्ये, शहरात पायी फिरून केली पाहणी

अमरावती महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त वर्षा लड्डा आता पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्या असून, शहरातील स्वच्छता, अतिक्रमण आणि नालेसफाईच्या प्रश्नांवर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात केली आहे. सिटी न्यूजच्या ‘हेल्थ चेकअप’ मोहिमेतून प्रभाग क्रमांक ७ मधील गंभीर समस्या समोर आल्यानंतर मनपा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज पंचवटी चौक, गाडगेनगर, नवसारी, इतवारा बाजार आणि परिसरातील विविध भागांची प्रत्यक्ष पायी फिरून पाहणी केली. या दौऱ्यात शहरातील अनेक ठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या आणि रस्त्यावर झालेलं अतिक्रमण पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

“नागरिकांना मूलभूत सुविधा देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. स्वच्छता आणि नालेसफाईत कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तात्काळ नालेसफाई, कचरा उचलणे आणि अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विशेषतः इतवारा बाजार परिसरात व्यापाऱ्यांना त्यांनी स्पष्ट इशारा दिला. “दुकानातील सामान दुकानाच्या मर्यादेतच ठेवा. रस्त्यावर अतिक्रमण करू नका. तसेच कचरा नाल्यात टाकल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी बजावले. इतवारा बाजारातील अरुंद रस्ते आणि नाल्यांमध्ये साचलेला कचरा पाहून त्यांनी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले.

याशिवाय अर्जुन नगर उद्यानालाही त्यांनी भेट देत तेथील सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि देखभालीबाबत विशेष सूचना दिल्या. उद्यान अधिक आकर्षक आणि नागरिकांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात मनपाचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांच्या या धडाकेबाज दौऱ्यामुळे प्रशासनात चांगलीच धावपळ सुरू झाली असून, शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी कारवाईला आता वेग येण्याची शक्यता आहे.

अमरावती शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासन आता कठोर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्त वर्षा लड्डा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, “ही मोहीम केवळ प्रशासनाची नाही, तर नागरिकांनीही पुढाकार घेतला तरच शहर खर्‍या अर्थाने बदलू शकते,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button