परतवाडा-अचलपूर प्रकरणावर नवनीत राणा आक्रमक; आरोपींचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर परिसरात समोर आलेल्या कथित अल्पवयीन मुलींच्या शोषण, ब्लॅकमेलिंग आणि व्हिडिओ प्रकरणावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एएनआयशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, “परतवाडा-अचलपूर परिसरात जे काही घडलं आहे, ते अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. जर कोणी मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करत असेल, त्यांना ब्लॅकमेल करत असेल, तर अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. त्यांचे नागरिकत्व रद्द केले पाहिजे.”
नवनीत राणा यांनी या प्रकरणाची तुलना नाशिकमधील एका आयटी कंपनीतील कथित प्रकरणाशी केली. त्या म्हणाल्या की, नाशिकमध्येही काही कर्मचाऱ्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते ऑनलाईन प्रसारित केल्याचा आरोप समोर आला होता. परतवाडा-अचलपूरमध्येही त्याच प्रकारचा “सिस्टिमॅटिक पॅटर्न” दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी पीडित मुलींना पुढे येण्याचे आवाहन करत, “भीती बाळगू नका. तुम्ही आवाज उठवा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत अनेक व्हिडिओ समोर आल्याचा दावा करत त्यांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे म्हटले.
नवनीत राणा यांनी काही राजकीय नेत्यांवरही टीका करत, “धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काही जण अशा घटनांवर मौन बाळगतात. मात्र मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कुठलीही दुटप्पी भूमिका असता कामा नये,” असे म्हटले.
तसेच या प्रकरणामागे कोणते मोठे जाळे आहे का, बाहेरून आर्थिक मदत किंवा निधी मिळत होता का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. “या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आवश्यक असल्यास आर्थिक व्यवहार व परदेशी निधी यांचाही तपास केला जावा,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आले असून, पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया खाते, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांची तपासणी सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



