बापासारखा आधार द्यायचा होता, पण सासऱ्यानेच सुनेवर वर्षभर अत्याचार; खुलताबाद हादरले

माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना खुलताबाद शहरातून समोर आली आहे. ज्या सासऱ्याने सुनेला मुलीसारखी वागणूक द्यायला हवी होती, त्यानेच तिच्यावर तब्बल वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुलताबाद येथील २३ वर्षीय विवाहितेचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. विवाहानंतर ती पती, मुलगा आणि सासरच्या मंडळींसह राहत होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, तिच्या आयुष्यात भीषण संकट कोसळले.
पीडितेचा पती रात्रीच्या पाळीत कामावर जात असल्याचा फायदा घेत, सासऱ्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार एक-दोन दिवसांचा नसून तब्बल वर्षभर सुरू होता, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
पीडितेने वारंवार विरोध करत या कृत्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी सासरा तिला धमक्या देत गप्प बसवत होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने जेव्हा ही बाब आपल्या सासूला सांगितली, तेव्हा तिनेही तिच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी “कुणाला काही सांगू नको, मी त्याला समजावते,” असं सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पीडितेने आपल्या पतीकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, पतीनेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट, “वडील तुझी काळजी घेत आहेत,” असे म्हणत त्याने वडिलांची बाजू घेतली. एवढंच नाही, तर चार महिन्यांपूर्वी त्याने पत्नीला सोडून घर सोडल्याची माहिती समोर आली आहे.
अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेत, पीडितेने खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासऱ्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, पतीवर सहआरोपी म्हणून गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
“घरातच सुरक्षितता धोक्यात आली, तर स्त्रीने न्याय कुणाकडे मागायचा?” असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



