यवतमाळमध्ये एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड – संयुक्त कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त!

यवतमाळ जिल्ह्यात अवैध बियाणे विक्रीविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली असून, कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे बियाणे तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्लॅटिनम 5G’ या नावाने ओळखली जाणारी प्रतिबंधित कापूस बियाणे दोन चारचाकी वाहनांमधून यवतमाळ शहरात आणली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत ‘किया सोनेट’सह इतर वाहनांना अडवून तपासणी केली.
झडतीदरम्यान तब्बल ४०० पाकिटे (८ पोती) प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आली. या बियाण्यांची किंमत सुमारे ३ लाख ६० हजार रुपये आहे. याशिवाय दोन चारचाकी वाहने आणि तीन मोबाईल फोन असा एकूण २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कृषी अधिकारी प्रेमनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून संतोष ठाकरे, निखिल लंगडे आणि सतीश ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा बेकायदेशीर बियाण्यांमुळे उत्पादन घटण्यासोबतच पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉 ही कारवाई म्हणजे अवैध बियाणे माफियांवर मोठा प्रहार असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.



