मुंबई विमानतळावर ३८ कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; २४ महिलांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence – DRI) मोठी कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा मोठा रॅकेट उघड केला आहे. या कारवाईत तब्बल ३७.७४ कोटी रुपयांचे सुमारे २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले असून, २४ महिलांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे DRIने विशेष ऑपरेशन राबवून या महिलांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान २५.१० किलो सोन्याच्या लड्या आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलांनी सोने अत्यंत कौशल्याने लपवले होते. काहींनी बुटांमध्ये, तर काहींनी कपड्यांच्या आत खास तयार केलेल्या पाऊचमध्ये सोने ठेवले होते. काही प्रकरणांमध्ये शरीरावर सोने लपवण्याचे प्रकारही उघड झाले आहेत. तपास यंत्रणांना संशय आहे की, या महिलांना तस्करीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.
प्राथमिक तपासानुसार ही कारवाई एका संघटित आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक केलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.



