BhandaracitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

भंडाऱ्यात दिवसाढवळ्या मुरुमाची लूट; विरली खंदारमध्ये अवैध उत्खननाचा पर्दाफाश!

भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार परिसरात गौण खनिज म्हणजेच मुरुमाच्या अवैध उत्खननाचा मोठा प्रकार समोर आला असून, दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरली खंदार परिसरात ट्रॅक्टर आणि मोठ्या ट्रकच्या माध्यमातून मुरुमाची खुलेआम वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, ही वाहतूक दिवसाढवळ्या होत असतानाही महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गावात तलाठी आणि कोतवाल यांसारखी जबाबदार यंत्रणा कार्यरत असतानाही त्यांच्या कार्यक्षेत्रातच हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरची हालचाल कैद झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या फुटेजची अद्याप अधिकृत तपासणी झालेली नाही.

दरम्यान, सततच्या उत्खननामुळे परिसरात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना काही मोजक्या लोकांचा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

भंडाऱ्यातील हा मुरुम घोटाळा आता प्रशासन खरोखर उघड करणार का, की पुन्हा एकदा दडपला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button