BhandaraCrime NewsLatest News

वाळू माफियांची महसूल अधिकाऱ्यांच्या कारला धडक

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अवैध वाळू तस्करीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफियांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिरे आणि महसूल सेवक अमित बावणकर हे गोलेवाडी परिसरात सरकारी कामासाठी गेले होते. यावेळी पवनी-भंडारा मार्गावर त्यांना एक संशयास्पद ट्रक दिसला.

तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ८ ब्रास अवैध रेती आढळून आली. महसूल पथक कारवाई करत असतानाच ट्रक मालक आणि त्याचे साथीदार चारचाकीतून घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत कारवाईत अडथळा निर्माण केला. यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

महसूल पथकाने पाठलाग सुरू केला आणि इथेच झाला जीवघेणा खेळ! आरोपींनी थेट अधिकाऱ्यांच्या अल्टो कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अधिकारी थोडक्यात बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी अड्याळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात वाळू माफियांचे वाढते धाडस पाहता प्रशासन आता काय कारवाई करणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button