बैलवाड्यात विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

बैलवाडा : गावालगतच्या शेतशिवारात विजेच्या खांबावर करंट लागून एका माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कृष्णाजी रहाटे यांच्या शेताजवळ उभारलेल्या वीज वितरण कंपनीच्या खांबावर एक माकड चढले होते. दरम्यान, खांबावरील जिवंत विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच सचीन शेटे, लुकेश भडंग, आयुष रहाटे आणि डिंकू पेंदाम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मिळून काळजीपूर्वक माकडाचा मृतदेह खांबावरून खाली उतरवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून उघड्या वीज तारा आणि अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा घटना टाळण्यासाठी वीज वितरण यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



