citynewsLatest NewsMaharashtraNagpur

बाबुलखेड्यात पुन्हा भीषण आग; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

नागपूर : बाबुलखेडा परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ काल रात्री पुन्हा भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी आग लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अचानक लागलेल्या आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, दूरवरच्या भागातूनही ज्वाला आणि काळा धूर स्पष्टपणे दिसत होता. स्थानिक नागरिकांनी या आगीचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच याच परिसरात मोठी आग लागली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक खबरदारी न घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सुरक्षा यंत्रणांची कमतरता, आग प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळेच आगीची पुनरावृत्ती झाल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. बाबुलखेड्यात वारंवार लागणाऱ्या आगीमुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button