AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

महावीर जयंतीनिमित्त अमरावती कारागृहात सेवाभावी उपक्रम; कैद्यांसाठी आरोग्य तपासणी व औषध वाटप

अमरावती (प्रतिनिधी):
अमरावतीतील मध्यवर्ती कारागृहात भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. “जगा आणि जगू द्या” या संदेशाला साजेसा असा हा उपक्रम थेट कारागृहाच्या भिंतींपर्यंत पोहोचला.

दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांच्या पुढाकारातून कैदी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करण्यात आले. या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. मुळव्याध, फिशर, भागंदर, किडनी विकार, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांवर विशेष मार्गदर्शन व उपचार देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक विलास भोईते उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर डॉक्टर, समाजसेवक आणि जैन समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान अभिनंदन पेंढारी यांनी “भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. समाजसेवा हीच खरी धर्मसेवा असून ती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे,” असे प्रतिपादन केले.

कारागृह प्रशासनानेही या उपक्रमाचे कौतुक करत पेंढारी यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेतली.

दरम्यान, कारागृह म्हणजे केवळ शिक्षा नव्हे तर सुधारण्याची एक संधी असते. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, महावीर जयंतीनिमित्त साजरा झालेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने “मानवतेचा उत्सव” ठरला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button