कोलकात्यात थरारक घटना; पतीने मुलीसमोरच पत्नीची चाकूने हत्या, आरोपी अटकेत

कोलकाता (प्रतिनिधी):
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कस्बा परिसरात एका नशेच्या आहारी गेलेल्या पतीने आपल्या लहान मुलीसमोरच पत्नीची निर्घृणपणे चाकूने हत्या केली. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून पळून जात असताना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव बिनोद सिंह असे असून तो नशेच्या आहारी गेला होता आणि कोणतेही काम करत नव्हता. घराचा सर्व खर्च त्याची पत्नी स्वप्ना सिंह ही स्थानिक संस्थेत काम करून चालवत होती. बिनोद हा वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन पैशांची मागणी करत असे आणि नकार मिळाल्यास पत्नीशी वाद घालत मारहाण करत असे.
शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बिनोदने पत्नी स्वप्नाकडे ४ हजार रुपयांची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने घरात गोंधळ घातला आणि निघून गेला. मात्र, रविवारी पहाटे तो पुन्हा घरी परतला आणि दरवाजा ठोठावू लागला.
दरवाजा उघडताच तो थेट घरात शिरला आणि झोपलेल्या स्वप्नावर अचानक चाकूने हल्ला करत तिच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात स्वप्नाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही घटना कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण रूप समोर आणणारी असून समाजात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.



