केंद्राचा मोठा निर्णय; कमर्शियल LPG कोटा 50% वरून 70% पर्यंत वाढवला

नवी दिल्ली :
मिडल ईस्टमधील तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील विलंबामुळे एलपीजी पुरवठा बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी एलपीजी कोटा 50 टक्क्यांवरून वाढवून 70 टक्के करण्यात आला आहे.
होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या एलपीजी टँकर्सना विलंब होत असल्याने देशातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे घरगुती वापरासोबतच उद्योग आणि व्यापार क्षेत्रातही अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी राज्यांना 50 टक्के एलपीजी पुरवठा देण्याचे निर्देश होते. मात्र आता त्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून एकूण 70 टक्के एलपीजी औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे स्टील, ऑटोमोबाईलसारख्या महत्त्वाच्या उद्योगांसह दुकाने आणि कारखान्यांचा एलपीजी पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



