युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅससाठी नागरिकांची झुंबड; एजन्सीसमोर लांबच लांब रांगा

दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट सामान्य नागरिकांवर उमटताना दिसत आहेत. अमरावती शहरात बुधवार (२५ मार्च) सकाळपासून विविध गॅस एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल, या भीतीने नागरिकांनी सिलेंडर साठवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, गॅस बुकिंगसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून, भर उन्हात त्यांना गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गोंधळाचेही वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी होत आहे.
दोन देशांतील युद्धाचा परिणाम आता सामान्य जनतेपर्यंत पोहोचताना दिसत आहे… प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा देणं अत्यावश्यक ठरणार आहे…



