विहिरीत सापडला बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह

लोणखैरी येथील रहिवासी विनायक नीलकंठजी टाकळखेडे हे सोमवार सायंकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्रभर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, पण कोणताही ठावठिकाणा लागला नाही. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान, शेजारील शेतमालक आपल्या विहिरीकडे गेले असता, त्यांना पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ गावचे सरपंच लीलाधर भोयर यांना माहिती दिली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सरपंचांनी तातडीने खापरखेडा पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण लोणखैरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक टाकळखेडे यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेने लोणखैरी गाव हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



