अमरावती महानगरपालिका मध्ये जनगणना आढावा बैठक; सौम्या शर्मा चांडक यांचे ‘काम गांभीर्याने करा’ आवाहन

अमरावती, दि. २३ मार्च २०२६ :
देशभरात लवकरच सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत आज जनगणना तयारीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जनगणनेच्या सर्व टप्प्यांवरील तयारीचा व्यापक आढावा घेण्यात आला असून प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक उपस्थित होत्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी जनगणनेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. यावर्षीची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने, मोबाईल ॲपच्या माध्यमातून पार पडणार असल्याने प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती आत्मसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. डिजिटल प्रणालीमुळे काम अधिक वेगवान व अचूक होणार असले तरी त्यासाठी सजगता व तांत्रिक कौशल्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनगणना ही कायद्याच्या अधीन असलेली प्रक्रिया असल्याने प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. नागरिकांकडून माहिती संकलित करताना विश्वास निर्माण करणे, योग्य मार्गदर्शन करणे तसेच माहितीची गोपनीयता कायम राखणे याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
यावेळी यंदा जातनिहाय जनगणना होणार असल्याने संबंधित नोंदी अत्यंत काळजीपूर्वक व अचूकपणे घेण्याचे निर्देश देण्यात आले. सुमारे १६ वर्षांनंतर होत असलेली ही जनगणना देशाच्या सामाजिक, आर्थिक व लोकसंख्यात्मक स्थितीचे अद्ययावत चित्र समोर आणणार असून भविष्यातील विकास आराखडे, पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना व विविध धोरणे निश्चित करण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या अनुषंगाने घरभेटींचे सविस्तर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
जनगणना ही केवळ शासकीय उपक्रम नसून देशाच्या भवितव्याशी निगडित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे या कार्यात सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे व गांभीर्याने काम करावे, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी केले.
या बैठकीत उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, सहाय्यक निवडणुक अधिकारी अक्षय निलंगे, कैलास कुलट, मनपा कर्मचारी उपस्थित होते.



