Crime NewsDaryapurLatest News

अवैध दारूवरून ग्रामस्थांचा संताप, पोलिसांवर थेट हप्त्याचे आरोप

दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावात अवैध देशी दारूचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांनी या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या. मात्र, पोलिसांकडून केवळ थातूर-मातूर कारवाई करून संबंधित दारू विक्रेत्यांना पुन्हा मोकळं सोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज या सर्व प्रकाराला कंटाळून कळाशी गावातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांना गावात बोलावून, अवैध दारू विक्रीबाबत जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की, अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांना हप्ता दिला जातो, त्यामुळेच या धंद्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. यासोबतच संबंधित बीट जमादार यांच्यावरही हप्तावसुलीचे आरोप करण्यात आले असून, त्यांची तात्काळ बदली किंवा हकालपट्टी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

दरम्यान, “गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकरणावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button