अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; सागर जाधव याला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत रौप्य पदक

अमरावती: चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दिग्रस येथील बी.बी. आर्ट्स, कला व वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू श्री. सागर जाधव याने ६० किलो वजन गटात रौप्य पदक (Silver Medal) पटकावून विद्यापीठाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. सागरच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि योग्य नियोजनाचा वाटा आहे. त्याला अमरावती येथील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्रसिद्ध प्रशिक्षक डॉ. जयंत इंगोले यांचे बहुमूल्य तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सागरने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली.
विद्यापीठ प्रशासनाकडून कौतुकाचा वर्षाव
रौप्य पदक विजेता सागर जाधव याने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यापीठ स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. तुनजा राऊत यांनी रौप्य पदक पटकाविल्याबद्दल सागर जाधव आणि त्याचे प्रशिक्षक डॉ. जयंत इंगोले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



