Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsEducation NewsIndia NewsLatest NewsLocal NewsMaharashtraSports

अमरावतीत ‘शिव केसरी कुस्ती स्पर्धा 2026’ रंगणार; राज्यभरातील पैलवानांचा सहभाग

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी… कुस्तीप्रेमींसाठी रोमांचक पर्वणी ठरणारी भव्य ‘शिव केसरी कुस्ती स्पर्धा 2026’ नेहरू मैदानावर रंगणार आहे. राज्यभरातील नामांकित पैलवानांच्या उपस्थितीत दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे 24 आणि 25 मार्च रोजी भव्य ‘शिव केसरी कुस्ती स्पर्धा 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. नमो युवक संस्था, अमरावती यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विदर्भ कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पैलवान करण डैडवाल यांच्या मित्रपरिवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात केसरी कुस्ती सामने रंगणार आहेत.

स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राज्यस्तरीय आणि विदर्भस्तरीय अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. बक्षिसांची रक्कमही आकर्षक ठेवण्यात आली आहे.

वरिष्ठ पुरुष राज्यस्तरीय गटात प्रथम बक्षीस 71 हजार रुपये आणि चांदीची गदा, तर द्वितीय बक्षीस 41 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. विदर्भस्तरीय गटात प्रथम बक्षीस 31 हजार रुपये व चांदीची गदा, तर द्वितीय बक्षीस 21 हजार रुपये आहे.

महिला गटात प्रथम बक्षीस 21 हजार रुपये व चांदीची गदा, तर द्वितीय बक्षीस 11 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर विविध वजन गटांमध्येही विजेत्या पैलवानांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागाचे प्रमुख संजय तिरधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. स्पर्धेत विदर्भ आणि महाराष्ट्रातील सुमारे 250 ते 300 नामांकित पैलवान सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, सहभागी कुस्तीगीरांसाठी निवास व भोजनाची विशेष सोय करण्यात आली आहे. दोन दिवस चालणारी ही स्पर्धा अमरावतीकरांसाठी मोठा क्रीडा सोहळा ठरणार आहे.

कुस्तीप्रेमींनी 24 आणि 25 मार्च हे दिवस राखून ठेवावेत… कारण अमरावतीत रंगणार आहे कुस्तीचा थरार! नेहरू मैदानावरील या भव्य स्पर्धेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button