Latest NewsMaharashtra Politics

मेळघाटातील 70% मजुरांची मजुरी थकली; आमदार यशोमती ठाकूर संतप्त, आयुक्तांना खडेबोल

राज्यात होळीचा सण होऊन गेला असतानाही मेळघाटातील हजारो मजुरांना अद्याप त्यांच्या मजुरीचे पैसे मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘रोजगार हमी योजने’अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 70 टक्के मजुरांची मजुरी थकीत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री व आमदार Yashomati Thakur यांनी केला आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेत त्यांनी नागपूर येथील रोजगार हमी योजना आयुक्तांना थेट फोन करून प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मजुरांचे थकीत पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आयुक्तांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर कठोर शब्दांत टीका केली. “आमदार आणि खासदारांचे पगार दर महिन्याच्या 1 तारखेला वेळेवर जमा होतात, मग 100 दिवस कष्ट करणाऱ्या मजुरांच्या मजुरीसाठी टाळाटाळ का केली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मेळघाटातील मोठ्या संख्येने मजुरांच्या खात्यात अद्याप मजुरी जमा न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.

मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र मजुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक मजुरांना यंदा सण साजरा करता आला नसल्याचेही ठाकूर यांनी नमूद केले. “मजुरांकडे सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. त्यांच्या हक्काची मजुरी अडवून ठेवणे अन्यायकारक आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

दरम्यान, मेळघाटातील 70 टक्के मजुरांची थकीत मजुरी तात्काळ देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मजुरांच्या हक्काचा प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आयुक्तांना खडेबोल सुनावल्यानंतर प्रशासन कितपत वेगाने हालचाल करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button