AmravatiLatest Newspolitics

मनपा स्थायी समिती सभापती कुणाचा? भाजप की राष्ट्रवादी?

अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी महायुतीमध्येच चुरस निर्माण झाली आहे. सहा मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हे महत्त्वाचे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार, याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

चार वर्षांनंतर अमरावती महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले असून या पंचवार्षिकमधील पहिल्या स्थायी समितीचे गठन करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी ही समिती महापालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे ५ सदस्य, काँग्रेसचे ३ सदस्य, युवा स्वाभिमानचे ३ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य, एमआयएमचे २ सदस्य, तर शिवसेना शिंदे गटाचा १ सदस्य आहे. या आकडेवारीनुसार भाजपप्रणीत महायुतीकडे ११ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर विरोधकांकडे फक्त ५ सदस्य आहेत. सभापती निवडण्यासाठी किमान ९ मतांची आवश्यकता असल्यामुळे महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड मानले जात आहे.

दरम्यान महायुतीमध्ये आधीच महापौर पद भाजपला आणि उपमहापौर पद युवा स्वाभिमानला देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु दुसरीकडे भाजप हे महत्त्वाचे पद स्वतःकडेच ठेवणार असल्याचीही जोरदार चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे.
सभापतिपदासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर आणि भाजपचे मिलिंद बांबल यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

मिलिंद बांबल यांनी यापूर्वी स्थायी समितीचे सभापती पद भूषविले असल्यामुळे भाजपकडून नवीन चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त दोन सदस्य असले तरी अनुभवी म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उद्या शुक्रवार सहा मार्च रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर अकरा वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत १६ सदस्य मतदान करणार असून स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कोणाचा झेंडा फडकणार याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.

स्थायी समितीचे सभापती पद म्हणजे महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणाचे महत्त्वाचे पद मानले जाते. त्यामुळे हे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार, याचा निर्णय आता उद्याच्या निवडणुकीत होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button