नागपुरात दिवसाढवळ्या थरार! पती-पत्नीने तरुणाची चाकूने हत्या; प्रेमसंबंधातून घडला खून

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कोराडी रोडवर पती-पत्नीने मिळून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर वानखेडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये या दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सागर यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र नंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्याशी झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. तरीदेखील सोनाली आणि सागर यांच्यात लग्नानंतरही संपर्क सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत राजू गजभिये यांनी यापूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती.
दरम्यान, होळीच्या निमित्ताने सागर पुण्याहून आपल्या गावी आला होता. त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी संदेश पाठवला होता. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सागर आणि सोनाली एकाच दुचाकीवरून जात असताना सोनालीने मुद्दाम तिची पर्स रस्त्यावर टाकली. सागरने दुचाकी थांबवताच सोनालीने सोबत आणलेल्या चाकूने त्याच्यावर दोन वार केले.
यानंतर पाठलाग करत आलेल्या राजू गजभियेनेही सागरवर वार करत हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतले. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



