३१ डिसेंबरच्या रात्री गांधी चौकात भीषण आगअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

अमरावती : ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात एक मोठी दुर्घटना घडता-घडता टळली. गांधी चौक परिसरातील ‘महालक्ष्मी घर संसार सेल’ या घरगुती वस्तूंच्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास गांधी चौक परिसरातील संबंधित दुकानाला आग लागली. आगीचे लोळ दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल केल्या. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे शेजारील दुकाने तसेच रहिवासी भागाला आग पसरण्यापासून वाचवण्यात यश आले.
या आगीत दुकानाचे संचालक रवी ढोके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याच्या वेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही लहान मुले फटाके फोडत असताना ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अग्निशमन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे.
या घटनेचा तपास सिटी कोतवाली पोलीस स्टेशन करीत असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक कोटनाके, पोलीस उपायुक्त शाम घुगे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आगीच्या घटनेमुळे गांधी चौक ते अंबा गेट हा मार्ग जवळपास एक तास पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.



