अमरावती महापालिका निवडणूक : प्रभाग १४, १५ व १६ मध्ये निवडणूक हालचालींना वेग; ६७ नामांकन अर्ज वैध

अमरावती
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये निवडणूक हालचालींना वेग आला आहे. जव्हार गेट, बुधवारी छाया नगर, पठाणपुरा, अलीम नगर आणि रहिमत नगर परिसरातील प्रभाग क्रमांक १४, १५ आणि १६ मध्ये उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, या प्रभागांमध्ये एकूण ६७ नामांकन अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष उमेदवार रुकसाना बानो शब्बीर शहा यांनी आपला नामांकन अर्ज माघारी घेतला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ४ (ड) मधील उमेदवार डॉ. मतीन अहमद यांनीही अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. मतीन अहमद म्हणाले की, “काँग्रेस पक्षाकडून मला अपेक्षित न्याय मिळाला नाही. त्यामुळे मी माझ्या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करून नामांकन अर्ज वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
नामांकन अर्जांची छाननी व माघारीच्या प्रक्रियेमुळे संबंधित प्रभागांतील निवडणूक चित्र हळूहळू स्पष्ट होत असून, आगामी काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.



