AmravatiLatest NewsMaharashtra

नववर्ष स्वागतासाठी अमरावतीत कडक पोलीस बंदोबस्तशहरभर नाकेबंदी, वाहन तपासणी; मध्यरात्रीपर्यंत पोलीस गस्त

अमरावती : वर्षाचा शेवटचा दिवस नागरिक आनंदात साजरा करत असतानाच, शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरभर नाकेबंदी, वाहन तपासणी आणि मध्यरात्रीपर्यंत पोलीस गस्त सुरू होती.

३१ डिसेंबर रोजी शहरात ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता वाढवली होती. शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ३९ ठिकाणी नाकेबंदी उभारून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

विशेषतः शहरातील मुख्य चौक असलेल्या राजकमल चौकात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपस्थिती होती. येथे वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्यात आली तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ हे स्वतः राजकमल चौकात उपस्थित राहून बंदोबस्ताची पाहणी करीत होते.

या सुरक्षाव्यवस्थेत सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारू पिऊन वाहन चालवणारे तसेच विनाकारण गोंधळ घालणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले होते.

या कडक बंदोबस्तामुळे अमरावती शहरात नववर्षाचे स्वागत सुरक्षित व शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button