Accident NewsLatest NewsNanded

माहूर–किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावर भीषण अपघातदुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, चारचाकी चालक गंभीर जखमी

नांदेड / माहूर : माहूर–किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात घडला. महिंद्रा इको चारचाकी आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, चारचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास माहूर–किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे (वय २९) हे वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको चारचाकी वाहनाने (क्रमांक एम.एच. २७ ए.आर. ९२१०) गेले होते. परतीच्या प्रवासात नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमल प्रसाद मिश्रा (वय ६०, रा. सायफळ, ता. माहूर) हे शाईन कंपनीच्या मोटरसायकलवर (क्रमांक एम.एच. ए.जे. १५८९) प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल शेकडो फूट दूर फेकली गेली आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य दिसून आले. या अपघातात जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात चारचाकी चालक रुपेश आराधे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथे रेफर केले.

घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह व जखमींना रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button