Latest NewsMaharashtra

*जेजुरीत उधळलेल्या भंडाऱ्याने घेतला पेट!

नगरसेवकांसह 16 जण भाजले; धक्कादायक Video व्हायरल*

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडाजवळ विजयाचा हा आनंद एका क्षणात भयावह ठरला. विजयी जल्लोषादरम्यान अचानक आगीचा भडका उडाल्याने नगरसेवकांसह 16 ते 17 जण भाजल्याची घटना घडली असून, याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


नेमकं घडलं काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयानंतर जेजुरी गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

जेजुरी गडाच्या पायऱ्या सुरू होतात त्या कमानीवर काही कार्यकर्ते उभे राहून खाली उभ्या असलेल्या विजयी उमेदवारांवर आणि समर्थकांवर भंडारा उधळत होते. हा भंडारा उधळण्याचा प्रकार वारंवार सुरू असतानाच, खालील बाजूला काही महिला कार्यकर्त्या विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन पुढे आल्या.


आरतीच्या ज्योतीतून भडका उडाला

वरून पडत असलेला भंडारा थेट आरतीच्या ताटातील ज्योतीच्या संपर्कात आला आणि क्षणातच त्याने पेट घेतला. अचानक आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचल्या.


16 ते 17 जण भाजले, सुदैवाने जीवितहानी नाही

या दुर्घटनेत 16 ते 17 जण भाजल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात काही कार्यकर्ते आणि नगरसेवकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा झाली नसून, सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.


भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आग लागल्याचा संशय

या आगीमागचं कारण म्हणून भेसळयुक्त भंडारा असल्याचा दावा केला जात आहे. भेसळयुक्त भंडाऱ्यामध्ये नैसर्गिक हळदीपेक्षा रासायनिक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे तो आगीच्या संपर्कात आला की पटकन पेट घेण्याची शक्यता असते.

याशिवाय काही जणांच्या अंगावर आधीपासूनच गुलाल किंवा रंग लागलेला असल्याने, त्यातील रसायनांमुळे आगीचा दाह अधिक वाढला आणि काही लोक भाजले गेल्याचंही सांगितलं जात आहे.


संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद; व्हिडीओ व्हायरल

विजयाचा जल्लोष साजरा करत असताना काही कार्यकर्ते मोबाईलवर व्हिडीओ शूट करत होते. याच मोबाईलमध्ये हा संपूर्ण थरारक प्रसंग कैद झाला असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.

  • “उत्साहाच्या भरात सुरक्षिततेचं भान ठेवायला हवं,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
  • तर काहींनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फोम किंवा केमिकल स्प्रेलाही अशाच प्रकारे अचानक आग लागते, अशी तुलना केली आहे.

जल्लोष की धोका? प्रश्नचिन्ह उपस्थित

जेजुरी गडाच्या पायथ्याशी घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत असून, जल्लोष करताना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण असल्याचं बोललं जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button