सावनेर–पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाचा अपघात; अनेक जखमी

सावनेर
सावनेर–पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. उज्जैन येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला केळवद हद्दीत अपघात झाला असून या घटनेत एका कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेच्या तपशीलानुसार, छत्तीसगड येथील योगेंद्र साहू आपल्या कुटुंबासह उज्जैन दर्शनासाठी निघाले होते. सावनेर–पांढुर्णा हायवे रोडवर केळवद हद्दीत त्यांच्या कारसमोर चालणाऱ्या ट्रकने अचानक वेग कमी केला. अचानक ब्रेक लागल्यामुळे कारचालकाचे वाहन नियंत्रणातून सुटलं आणि कार थेट ट्रकला धडकली.
या अपघातात कारचालक योगेंद्र साहू गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश दादा बनसोड घटनास्थळी दाखल झाले. यासह केळवद पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले.
जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पुढील तपास केळवद पोलीस करत आहेत.
पोलिसांनी प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. महामार्गावरील अचानक ब्रेक आणि वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन वाहनचालकांनी सुरक्षित अंतर ठेवावे आणि वेगावर नियंत्रण ठेवावे, असे सांगितले आहे.



