Latest NewsNagpur

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याला वाहनाने धडक; वन्यजीव उपचार केंद्रात हलवले

नागपूर

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांद्री माईन रेल्वे लाईन परिसरात आज सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वाहनाच्या धडकेत एक नर बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, देवलापारकडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या नर बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला आणि गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्रसहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांनी वनरक्षक रेखा चोंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्र मध्ये हलवले. सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनचालकांनी अधिक सतर्क राहावे, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी महामार्गांवर योग्य उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे वन विभाग आणि तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच, जखमी बिबट्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button