Latest NewsMaharashtra

वडिलांच्या डोळ्यासमोर लेकीची जलसमाधी

५ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत प्रसिद्ध जपाळेश्वर देवस्थान तलावात हर्षाली विनोद माकडे, वय १३ वर्षे, रा. भोजापूर (मानापूर) ही आपल्या वडिलांसोबत पोहायला आली होती. तिच्यासोबत तिचे मामा अजय वामन लोहबरे, वय ३३ वर्षे, रा. खात (भंडारा) हे देखील आले होते. हर्षाली सर्वात आधी तलावात उतरली, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. हे पाहून मामाने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु पाणी खोल असल्याने दोघेही बाहेर येऊ शकले नाहीत. वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलगी आणि साळ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हृदयद्रावक वातावरण पसरले आहे. स्थानिक गोताखोरांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम राबवली आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. दरम्यान, जपाळेश्वर देवस्थान तलाव परिसरात कुठल्याही प्रकारचे सूचनाफलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नसल्यानेच हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button