Latest News

उपवासाचा काळ आणि बंगाली मांसाहार? दुर्गापूजेच्या खास परंपरेमागचं खरं कारण

नवरात्र सुरू झाली आहे असून बंगाली संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाणारी दुर्गापूजेची तारखीही जवळ आली आहे. एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती मानणारे लोक या काळात उपवास करतात. अनेकजण काही पदार्थ, मसाले, मद्य आणि मांस यापासून नऊ दिवस दूर राहतात. मात्र दुसरीकडे बंगाली लोक एका मंडपातून दुसऱ्या मंडपामध्ये देवीच्या दर्शनासाठी जाताना अगदी मांसाहारी पदार्थांवरही या कालावधीत ताव मारताना दिसतात. मात्र या बाबतीत बंगालची उत्सव संस्कृती देशातील इतर भागांपेक्षा वेगळी का आहे? यंदाच्या नवरात्रीनिमित्त याबद्दलच जाणून घेऊयात…

जस जसं आपण देशाच्या पूर्वेला जातो…
नवरात्रीच्या पाचव्या दिवासापासून म्हणजेच पंचमीपासून दुर्गापूजा सुरू होते आणि महालयाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीपर्यंत चालते. नवरात्र हा देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातल्या प्रमुख उत्सवांपैकी एक असून या उत्सवाकडे त्यागाच्या माध्यमातून आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्तीचा काळ म्हणून पाहिले जाते. देशाच्या पूर्वेला असलेल्या राज्यांमध्ये दुर्गा देवीच्या पूजेची कथा मातेच्या घरी येण्याच्या मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात सांगितली जाते. अर्थात पूर्वेकडील भागामधील देवीसंदर्भातील ही श्रद्धा देखाली हिंदू धर्मग्रंथांमधून येते. मात्र या श्रद्धेनुसार असे मानले जाते की देवी दुर्गा या काही दिवसांत तिच्या मातृभूमीला भेट देण्यासाठी येते. याच कारणामुळे बंगाली लोक देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून सर्वोत्तम पदार्थ आणि पारंपारिक नैवेद्यांसहीत देवीचं हे घरी येणं अगदी उत्सहात साजरं करतात.

…म्हणून केला जातो मांसाहार
दरवर्षी, दुर्गापूजा मातेसाठी ढाक, धुंची आणि सुरेल लोकगीतांच्या माध्यमातून केलेल्या आवाहनापासून सुरू होते. मात्र बंगाली लोकांसाठी दुर्गापूजा उत्सव अधिक खास बनवणारी बाब म्हणजे या काळात दुर्गा मातेच्या रुपाने मुलगी तिच्या मातृभूमीत परत आल्याचा आनंद साजरा केला जातो. एका अर्थाने हे देवीचं माहेरवाशीणपण असतं. म्हणूनच उत्सवाचे प्रतीक असलेल्या या काळामध्ये बंगाली संस्कृतीमधील सर्वोत्तम मेजवानी आणि जेवण नैवेद्याच्या रुपात देवीला दाखवलं जातं. या काळात मांसाहारी अन्न तयार केले जाते आणि त्याचा आस्वाद घेतला जातो याचे प्रमुख कारण म्हणजे घरी परतताना मेजवानीचा पोटभर आनंद घेऊन परतावं. तसेच या काळात लेक घरी आल्याच्या आनंदात कोणतीही तपस्या केली जात नाही.

त्याशिवाय, असे देखील मानले जाते की मटण आणि मासे, जेव्हा निरामिश पद्धतीने म्हणजेच कांदा आणि लसूणशिवाय शाकाहारी पद्धतीच्या भाज्या तयार करतात तसे तयार केले जातात तेव्हा ते देवीला अर्पण केले जाऊ शकतात. विशेषतः संधी पूजेनंतर किंवा काली पूजादरम्यान हे पदार्थ देवीला दाखवले जातात. बंगालमध्ये, मांसाहार हा भरभराटी, प्रजननक्षमता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. विशेषतः मासे या गोष्टींचं प्रतिक मानले जातात. म्हणूनच मासे हे बंगाली विवाहचा महत्त्वाचा भाग असतात.

पौराणिक कथा काय?
पौराणिक कथांनुसार, दुर्गा देवी ही शक्तीचे सर्वोच्च रूप आहे असं मानलं जातं. विशेषतः समृद्ध आणि चैतन्यशील बंगाली शाक्त परंपरेमध्ये दुर्गा देवीला विशेष महत्त्व आहे. ही देवी विश्वाचे रक्षण आणि संरक्षण करणारी अंतिम शक्ती आणि दैवी ऊर्जा आहे, असं बंगाली परंपरेत मानलं जातं. ही कथा रौद्ररुप धारण केलेली देवी आणि भयंकर राक्षस महिषासुर यांच्यातील पौराणिक युद्धाशी संबंधित आहे. हा महासंघर्ष चांगल्या आणि वाईट यांच्यातील शाश्वत संघर्षाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. या युद्धातील देवीच्या विजयीचं स्मरण भव्य उत्सवाच्या आणि मेजवानीच्या माध्यमातून केले जाते.

पारंपारेनुसार यामध्ये यज्ञ मांसाची विधीगत तयारी आणि वाटणीचा समावेश आहे. ही अशी वाटणी केवळ भोगाचे प्रतिनिधित्व करत नसून देवीच्या उग्र, संगोपन आणि संरक्षणात्मक उर्जेचे प्रतिबिंब मानले जाते. या संदर्भात, मेजवानी ही त्याग किंवा संयमाच्या कृतीऐवजी भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक आनंदाची पवित्र अभिव्यक्ती असल्याचं मानलं जातं. या मेजवानीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समुदायांना एकत्र आणण्याचं, सांस्कृतिक ओळख, आध्यात्मिक शक्ती आणि दैवी स्त्री उर्जेची शक्ती मजबूत तसेच अधिक सशक्त करण्याचं काम या मेजवान्यांमधून होत असल्याने त्यांना बंगाली संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button