४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा

अमरावती- आज दिनांक १२ सप्टेंबर, दुपारी ३.३० च्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली. एका इसमाकडे मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलेंडर्सचा बेकायदेशीर साठा आहे आणि तो मशीनद्वारे रिफिलिंग करून त्यांची अवैध विक्री करत आहे.
या गंभीर माहितीनुसार, तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५८ गॅस सिलेंडर्स, ३ रिफिलिंग मशीन्स आणि २ मोठे वजन काटे असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपी साबिर लष्कर हासिम लष्कर, वय ४०, याच्यावर भा.दं.वि. कलम २८७, १२५ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरीया साहेब आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या धाडसी कारवाईमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर धंद्यावर अंकुश लावण्यात यश आले आहे.



