“कचरा शून्य” दृष्टीकोनासाठी शैक्षणिक संस्थांना सक्षम करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली-हॉटेल विरसा,
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने “कचरा शून्य आत्मनिर्भर शैक्षणिक संस्था” या उपक्रमांतर्गत शैक्षणिक संस्थांना सक्षम करण्यासाठी एकदिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा गुरुवार, 17 जुलै 2025 रोजी हॉटेल विरसा, अमरावती येथे यशस्वीरित्या पार पडली. फीडबॅक फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुग्राम यांनी या कार्यशाळेस तांत्रिक सहकार्य प्रदान केले. सदर संस्था अमरावती महानगरपालिकेसाठी स्वच्छता नॉलेज पार्टनर (SKP) म्हणून कार्यरत आहे.
या कार्यशाळेत शहरातील 55 शाळांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून सहभागी होत, त्यांनी “घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 (सुधारित 2024)” अंतर्गत Bulk Waste Generator (BWG) म्हणून स्वतःला सक्षम बनवण्याची दिशा स्विकारली. या उपक्रमाचा उद्देश शाळांना “कचरा शून्य, स्वयंपूर्ण संस्था” म्हणून घडविणे हा होता.
कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेच्या मा. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. अजय जाधव (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), डॉ. प्रकाश मेश्राम (कार्यकारी अधिकारी – शिक्षण विभाग), आणि डॉ. श्वेता बोके (SBM समन्वयक) हे मान्यवर उपस्थित होते. फीडबॅक फाउंडेशनतर्फे श्री. अजय सिन्हा (CEO), श्री. ज्योती प्रकाश आणि डॉ. हरभजन सिंग सहभागी झाले.
तांत्रिक सत्रात श्री. अजय सिन्हा यांनी सर्वसमावेशक आणि सहभागात्मक सादरीकरण केले. प्रमुख विषयांमध्ये पुढील बाबींचा समावेश होता:
BWG म्हणजे काय आणि त्यांची जबाबदारी कचऱ्याचे शास्त्रीय वर्गीकरण व स्त्रोतावरच योग्य विलगीकरण
जैविक कचऱ्याचे विकेंद्रित कंपोस्टिंग उपाय
घनकचरा व्यवस्थापनाची मूल्य साखळी
शाळांमध्ये SWM ची प्रभावी अंमलबजावणी करणारे संस्थात्मक उपाय
RRR केंद्रांचे महत्त्व व उपयोग
या सत्रात राष्ट्रीय व राज्य धोरणांशी सुसंगत सर्वोत्तम पद्धती आणि व्यवहार्य मॉडेल्स सादर करण्यात आले. सहभागी शाळांनी गटचर्चा, अनुभव-साधना आणि समविचार सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अनेक शाळांनी त्यांच्या संस्थांमध्ये कचरा लेखापरीक्षण, ग्रीन क्लब स्थापन, ऑन-साइट कंपोस्टिंग युनिट तयार करणे यासारख्या उपक्रमांची तयारी दर्शविली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मा. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सहभागी शाळांना मनपा तर्फे तांत्रिक मार्गदर्शन, IEC साहित्य, नियमित अनुवीक्षण भेटी, तसेच कचरा व्यवस्थापन सेवा पुरवठादारांशी संलग्नता यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी सर्व शाळांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सक्रिय सहभागाचे व प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विकेंद्रित व समुदायाभिमुख कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, अमरावतीच्या “कचरा मुक्त शहर” या प्रवासात नवचैतन्य निर्माण झाले आहे. याचप्रमाणे पुढील मोठ्यां प्रमाणात कचरा निर्मिती करणारे हॉटेल व्यवसायिक यांचेकरिता सुद्धा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता कर्मचारी सुद्धा या कार्यशाळेचा लाभ घेणार आहेत.



