अमरावती महानगरपालिका दक्षिण झोनमध्ये अतिक्रमणावर धडक कारवाई हातगाड्या, चायनीज गाड्या जप्त; अनधिकृत शेड हटवले
अमरावती : अमरावती महानगरपालिका दक्षिण झोन क्रमांक ४ अंतर्गत नवाथे प्लॉटपासून ते बेनाम चौक, डी मार्ट परिसर, साईनगर, गोपाल नगर, रेल्वे क्रॉसिंग तसेच साई मंदिर अकोली या परिसरात अतिक्रमणांवर मनपाने धडक मोहीम राबवली.
रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या हातगाड्या, चायनीज गाड्या व इतर खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या मनपाच्या अतिक्रमण पथकाने जप्त केल्या. यासोबतच काही दुकानदारांनी दुकानदार हद्दीबाहेर वाढवलेले पत्र्याचे शेड आणि लोखंडी बांधकामही हटवण्यात आले.
या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असली तरी, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली.
मनपा प्रशासनाने पूर्वसूचना देऊनही अतिक्रमण हटवले गेले नसल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक, झोनल अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि अतिक्रमण पथक उपस्थित होते.
यापुढे शहरातील कोणत्याही भागात अनधिकृत गाड्या, स्टॉल्स किंवा शेड लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाने दिला आहे.



