“‘छप्पर नाही तरी…’ सुशांत शेलारच्या प्रेरणादायी भावनांनी खळबळ!”

मुंबई: गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेचे मनमोहन माहिमकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना माहिमकरांनी त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. त्यांच्याकडे सध्या काम नाही आहे आणि सरकारकडून मिळणाऱ्या 5 हजारांमध्ये घर चालवावं लागतं, असं ते म्हणाले होते. शिवाय मोठा भाऊ आणि वहिनी यांनी त्यांची जागा विकण्यासाठी त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. शिवाय घरी एकटेच राहत असल्याने वृद्धापकाळात काळजी घेणारंही कोणी नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केलेली. Manmohan Mahimkar यांनी काम मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या माहिमकरांच्या मदतीला अभिनेता सुशांत शेलारने हात पुढे केला, त्यानंतर अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
अभिनेता सुशांत शेलारने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माहिमकरांची भेट घडवून दिली. Eknath Shinde यांनी माहिमकरांचं म्हणणं ऐकून घेतलं. वारसा अधिकारानुसार, गिरगावचं घर माहिमकर यांनाच मिळेल असे विश्वास सुशांतने व्यक्त केला. उपमुख्यमंत्र्यांचे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचेही सुशांतने माध्यमांशी बोलताना सांगितले. सुशांतने माहिमकरांसाठी पुढाकार घेतल्यानंतर कलाविश्वातील मंडळींनी त्याचे कौतुक केले. अभिनेता ऋतुराज फडके यानेदेखील सुशांतसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याची प्रशंसा केली आहे.
ऋतुराजने लिहिले की, ‘एक कलाकार दुसऱ्या कलाकाराच्या मदतीला धावून आला. मनमोहन माहिमकर यांना घराचा प्रश्न उद्भवलेला होता, राहत्या घरातून त्यांना घराच्या बाहेर काढण्याचा डाव त्यांच्या जवळच्या लोकांनी रचला होता, त्यांनी अनेक लोकांकडे मदतीचा हात मागितला… ही बातमी जेव्हा सुशांत शेलार दादा ला समजली तेव्हा ताबडतोप सुशांत दादांनी मनमोहन माहिमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी घडवून दिली आणि त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न सोडवला.’
त्याने पुढे लिहिले की, ‘ही पोस्ट करण्यामागचं कारण म्हणजे, कलाकाराच्या आयुष्यात अनेक संकटं येत जात असतात, तो त्यावर त्याच्या परीने मात करत असतो, पण जर त्याच्या डोक्यावर त्याच्या हक्काचं छप्पर नसेल, तर त्याची स्वप्नं पण उघड्यावर पडतात. सुशांत दादा प्रत्येकवेळी प्रत्येक कलाकाराच्या मागे ठामपणे उभा असतो, आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीला धावून जातो.’



