गांजाचं नाही, झेंड्याचं पीक! शेतात भाजप झेंड्यांची पेरणी करून बच्चू कडूंच्या यात्रेला सुकळी शेतकऱ्याची साथ
वाशिम/यवतमाळ : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरु केलेल्या ‘७/१२ कोरा’ पदयात्रेला आक्रमक रूप मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील सुकळी गावात एका शेतकऱ्याने शेतात भाजपचे झेंडे लावून सरकारच्या धोरणांवर उपरोधात्मक टीका केली आहे.
शेतकरी आंदोलनाचे हे दृश्य पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. गांजा, अफू यांचं पीक नको, तर पक्षाचे झेंडेच आता शेतात लावावे लागतील, अशी सणसणीत टीका या उपरोधातून करण्यात आली आहे. झेंडे लावून, फलक उभारून आणि मोदींसह राज्यातील प्रमुख नेत्यांना बैलगाडीवर दाखवत शेतकरी यांनी आपल्या नाराजीचा हुंकार नोंदवला आहे.
झेंड्यांची पेरणी, बैलगाडीवर नेते!
सुकळी गावातील एका शेतकऱ्याने शेतात भाजपचे झेंडे लावून केंद्र आणि राज्य सरकारकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अवहेलनेचा निषेध नोंदवला. यासोबतच, उभारलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैलगाडी चालवताना दाखवले असून, त्या गाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे फोटो झळकवले आहेत.
फलकावरील मजकूरही तितकाच तीव्र आहे:
“आता पेरणं थांबलं, एकतर गांजा, अफू नाहीतर पक्षाचे झेंडे! अनियंत्रित कायदा, जातीवाद, आत्महत्या, बेरोजगारी, ढीम्म प्रशासन, असुरक्षित महिला…”
या शब्दांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवण्यात आलं आहे.
मेंढपाळाच्या वेशातील आंदोलनाची आग
बच्चू कडू यांनी दुसऱ्या दिवशीच्या यात्रेला मेंढपाळाच्या वेशात सुरुवात केली. खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेत त्यांनी मेंढपाळ, शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित केलं. वाशिम जिल्ह्यातून सुरु झालेली ही पदयात्रा आज यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करत आहे.
- यात्रेचा मार्ग आणि मुक्काम
यात्रेची सुरुवात: पापळ, वाशिम – (डॉ. पंजाबराव देशमुख यांचे गाव) - 2रा दिवस: सुकळी, लोही, तरनोळीमार्गे मानकी (दुसरा मुक्काम)
- समारोप: चिलगव्हाण, यवतमाळ – देशातील पहिली शेतकरी आत्महत्या येथेच नोंदवली गेली होती.
एकूण १३८ किमीची पायी यात्रा – सात दिवसांची आंदोलनात्मक मोहीम
बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आवाज बुलंद करत असून, शेतकरी, मजूर, दिव्यांग आणि मागास घटकांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्धार यातून दिसतो. ‘७/१२ कोरा’ ही यात्रा म्हणजे केवळ कागदोपत्री नोंदी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कोरड्या जीवनाचं चित्र उभं करत आहे.



