Latest News

अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर सध्या पावसाळ्यात पडलेले खड्डे, बॅड पॅचेस भरण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणात कंत्राटदाराला प्रत्येकी १० लाख, असा एकूण २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अटल सेतूसारख्या नवीन पुलाची ही अवस्था झाल्याने वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक म्हणजे अटल सेतू हा २२ किलोमीटर लांब आहे. देशातील सर्वात मोठा सागरी पूल अशी त्याची ओळख असून, १८ महिन्यांपूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. २२ पैकी १६ किलोमीटर पूल समुद्रावर बांधला असून, उर्वरित पाच किलोमीटर मार्ग जमिनीवर आहे. सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या सेतूच्या नवी मुंबई दिशेकडील पुलाच्या भागात खड्डे पडले होते.

सेतूवर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. या वाहनांतून पडणाऱ्या तेलामुळे येथील डांबरी रस्त्यावर खड्डे पडले होते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे सर्रास या अडचणी येत आहेत. आता एमएमआरडीएने कंत्राटदाराकडून खड्डे भरून घेतले असून, याप्रकरणी २० लाखांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स, तर उर्वरित काळात खड्डे भरण्यासाठी हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ‘डागडुजीचा अतिरिक्त खर्च नाही’ मान्सून काळात अटल सेतूवर केलेल्या डागडुजीकरिता अद्याप अतिरिक्त आर्थिक खर्च झालेला नाही. ही कामे सध्या कंत्राटदाराच्या दोषदायित्व कालावधीत कंत्राटदाराच्याच खर्चाने सुरू आहेत, असे एमएमआरडीएने सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button