Latest NewsYavatmal

17 किलो गांजासह एक जेरबंद; 4.67 लाखांचा मुद्देमाल जप्त – पुसद पोलिसांची मोठी कारवाई

पुसद : दिग्रस ते काळी दौलत रस्त्यावर पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पथक क्रमांक 1 ने मोठी कारवाई करत 17 किलो गांजासह एकास अटक केली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

1 मे रोजी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पथक क्रमांक 1 चे प्रमुख अभिजीत सांगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन इसम रात्रीच्या सुमारास गांजा विक्रीसाठी काळी दौलत दिशेने जाणार असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र राउत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून वनोली गावाजवळ सापळा लावण्यात आला.

तपासणीदरम्यान संशयास्पद मोटरसायकल थांबवण्याचा इशारा दिला असता चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र मागील सीटवर असलेल्या संतोष गुलाब जाधव (वय 50, रा. चिचपात्र, ता. दिग्रस) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्यात 17 किलो 300 ग्रॅम वजनाचे गांजासदृश पदार्थ सापडले.

पोलिसांनी पुढील चौकशीत पळून गेलेल्या व्यक्तीची ओळख बळीराम वसराम राठोड (वय 37, रा. सातघरी, ता. महागाव) अशी पटवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गांजा (किंमत अंदाजे 4.32 लाख), मोटरसायकल (30 हजार) आणि मोबाईल (5 हजार) असा एकूण 4.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष जाधव यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी बळीराम राठोडच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि सुरेंद्र राउत यांच्या नेतृत्वाखाली आणि पथक प्रमुख अभिजीत सांगळे यांच्या टीमने केली आहे.

पोलीस विभागाकडून अवैध मादक पदार्थांबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button