Latest NewsMaharashtra

पैशाअभावी उपचार नाकारले… गर्भवतीचा मृत्यू! – पुण्यात संतापाचा उद्रेक

पुणे: “डॉक्टरांना आपण देव मानतो… पण जेव्हा देवच पैशाच्या माऱ्यात माणुसकी गमावतो, तेव्हा समाज थरथरतो. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे – पैशाअभावी उपचार नाकारल्यामुळे सात महिन्यांची गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. भाजपचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूनं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. हा केवळ एका महिलेचा मृत्यू नाही – हा माणुसकीचा मृत्यू आहे!

२९ मार्च रोजी तनिषा भिसे यांना गंभीर रक्तस्त्राव झाल्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. पण रुग्णालयाने उपचारासाठी थेट २० लाख रुपयांचा खर्च सांगितला. रुग्णाच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला.
परिवाराने तातडीनं अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली, पण डॉक्टरांनी आणि रुग्णालय प्रशासनाने ते नाकारलं. मजबुरीपोटी भिसे कुटुंबीयांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र रक्तस्त्राव थांबला नाही, आणि तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला… जर वेळेवर उपचार मिळाले असते, तर तनिषा यांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप आमदार अमित घोडके यांनी केला आहे. ‘पैशाअभावी एखाद्या गर्भवतीचा मृत्यू होणं ही वैद्यकीय व्यवस्थेची आणि माणुसकीची लाजिरवाणी हार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, नर्स, डॉक्टरांचे जबाब घेतले जात आहेत. भिसे कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र प्रश्न आहे – ही चौकशी पुरेशी आहे का? जबाबदारांवर कारवाई होईल का?
पुणं मोठं शहर आहे, आंदोलन झालं, विषय झोतात आला. पण अमरावती सारख्या शहरात अशा घटना गुदमरून मरतात. इथे कोण आवाज उठवणार? प्रशासन इथंही डोळेझाक करतं. कधी उघडतील डोळे…?

“एक गर्भवती महिला… दोन नवजात मुली… आणि पैशांच्या खेळात हरवलेलं माणूसपण… हे थांबायला हवं! आज पुण्यात घटना घडली, उद्या कुठं होईल? आरोग्य ही सेवा आहे, व्यवसाय नव्हे – हे डॉक्टर, रुग्णालयं आणि प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. नाहीतर अशा मृत्यूंचं ओझं अख्खं समाज उचलत राहील. सिटी न्यूजच्या वतीनं तनिषा भिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button