citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त! शाळेजवळच सुरू होता प्रतिबंधित मांजाचा साठवणूक आणि विक्रीचा धंदा

वाठोडा पोलिसांची धडक कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; ८ मोठ्या खाकी पोत्यांत सापडला नायलॉन मांजा, तीन मोबाईलही जप्त

नागपूर | प्रतिनिधी

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळेजवळच नायलॉन मांजाचा मोठा साठा करून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ४ च्या पथकाने ही कारवाई केली. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस पथक कर्तव्यावर असताना पोलीस अंमलदार महेश काटवले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्लॉट क्रमांक १४१, शिक्षक कॉलनी, राऊत नगर, अमर उटखुडे यांच्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा करण्यात आला आहे.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान आठ मोठ्या खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला. पोलिसांनी तातडीने हा साठा जप्त करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या कारवाईत वंश अनमोल जैस (वय १८ वर्षे, रा. जुनी शुक्रवारी, भारत माता बिल्डिंगमागे, नागपूर), शिवांश चंद्रप्रकाश शाहू (वय २४ वर्षे, रा. सोमवार क्वार्टर, नागपूर) आणि अमर रामेश्वर उटखुडे (वय १८ वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, प्लॉट क्रमांक १४१, राऊत नगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणातील प्रेम बैस (रा. ओमनगर, सुदामपुरी) हा पाहिजे आरोपी असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन कंपन्यांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

  • MONO KITE कंपनीचे नायलॉन मांजाचे १५० सिलेंडरबंद बंडल (कोन) – अंदाजे किंमत २ लाख २५ हजार रुपये.
  • MONO KITE FIGHTER कंपनीचे नायलॉन मांजाचे २७० सिलेंडरबंद बंडल – अंदाजे किंमत ४ लाख ५ हजार रुपये.
  • रियलमी, विवो आणि सॅमसंग कंपनीचे तीन मोबाईल फोन – एकूण किंमत ३० हजार रुपये.

अशा प्रकारे नायलॉन मांजा आणि मोबाईल फोन मिळून एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शाळेजवळच मांजाचा साठा; पोलिसांची कारवाई

विशेष म्हणजे, प्रतिबंधित नायलॉन मांजाचा हा साठा शिक्षक कॉलनी परिसरातील शाळेजवळ आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर दुखापत होण्यासह पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा मांजाची साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

या प्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र दामगुडे आणि पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ च्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button