विजय वडेट्टीवार यांनी संयम पाळावा, शरद पवारांवरील टीका निषेधार्ह; खासदार अमर काळेंची स्पष्ट भूमिका

पक्षाची अधिकृत भूमिका ठरण्यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांकडून वक्तव्य करणे अयोग्य; निर्णय झाल्यानंतरच आपली भूमिका मांडावी, वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा वडेट्टीवारांना सल्ला
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी नाराजी व्यक्त करत विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा निषेध केला आहे. पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप ठरलेली नसताना मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार अमर काळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी पक्षाची भूमिका निश्चित होण्यापूर्वी अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये करणे शोभणारे नाही. एखादा निर्णय झाला आणि तो चुकीचा वाटत असेल, तर त्यावर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, निर्णय झालेला नसताना आणि पक्षाची अधिकृत भूमिका समोर आलेली नसताना अशा पद्धतीने वक्तव्य करणे दुर्दैवी आहे.
पुढे बोलताना काळे यांनी वडेट्टीवार यांनी थोडा संयम पाळावा आणि सध्या मौन बाळगावे, असा सल्ला दिला. पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी. मात्र, निर्णय होण्यापूर्वीच सार्वजनिकरीत्या वक्तव्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
शरद पवार यांच्यावरील विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर आता काँग्रेसमधीलच एका खासदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने या विधानाचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. अमर काळे यांच्या या भूमिकेमुळे या विषयावरील राजकीय चर्चेला आणखी चालना मिळाली आहे.



